
Indian sword types
esakal
गिरिजा दुधाट
औशनस धनुर्वेदामध्ये तलवारीची अतिशय समर्पक स्तुती केलेली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘असिरेव परं शस्त्रं स्वहस्ते नित्यशोsक्षयम्।’ - ‘तलवार हेच सर्वोत्तम शस्त्र आहे, जे आपल्या हातात शेवटपर्यंत नाशरहित राहते.’ युद्धांमध्ये वापरली जाणारी विविध शस्त्रे ही प्रत्येक प्रकारच्या युद्धात किंवा प्रसंगांमध्ये वापरता येत नाहीत. तलवारीला मात्र अशा मर्यादा फार नाहीत. बहुगुणसंपन्न असल्याने साहजिकच तलवार युद्धाचे मुख्य शस्त्र बनली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धांसाठी किंवा प्रसंगांसाठी भारतामध्ये अनेक प्रकारच्या तलवारींची निर्मिती झाली.
भारतामध्ये प्राचीन ते मध्ययुगीन काळात ‘तलवार’ विषयावर विविध शस्त्रविद्वानांनी टीका लिहिल्या. तलवारींच्या प्रकारांच्या विभाजनाचे निकष या प्रत्येक टीकेमध्ये वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. वराहमिहिराची बृहत्संहिता ही तलवारीवर असलेल्या वेगवेगळ्या शुभ-अशुभ चिन्हांवर आधारित तलवारींचे प्रकार सांगते. शारंगधरपद्धती तलवारीमध्ये वापरल्या जाणाऱ्या धातूवरून विभाजन सांगते, तर युक्तिकल्पतरूसारखे काही ग्रंथ चक्क तलवारीच्या आवाजावरून प्रकार नमूद करतात! या सगळ्या प्राचीन, मध्ययुगीन ग्रंथांमधून भारतीय शस्त्रतज्ज्ञांनी तलवार शस्त्रावर केलेले सखोल संशोधन अधोरेखित होते.