
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेली पहिली वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समीट (वेव्हज्) ही आशयनिर्मितीच्या व्यावसायिक स्वरूपाच्यादृष्टीनं अत्यंत महत्वाची घडामोड ठरली. २०१५ ते २०२५ या दहा वर्षांचा विचार केला, तर २०२० पर्यंत समाजमाध्यमांवर आशयनिर्मितीला व्यावसायिक स्वरूप नव्हते. ‘वेव्हज्’ हे भविष्यातलं असं ठिकाण ठरणार आहे, जिथं भारताच्या कानाकोपऱ्यातून असे आशयनिर्मिती करणारे लोक एकमेकांच्या संपर्कात येऊ शकतील. या आगळ्यावेगळ्या परिषदेचा वेध...
भारताची बाजारपेठ जगाच्या दृष्टीनं सातत्यानं महत्त्वाची ठरली आहे. सर्व प्रकारच्या उत्पादनांना इथं संधी आहे. इथला खरेदीदार चोखंदळ आहे. परवडणारी वस्तू अधिकाधिक सवलतीनं मिळवण्याकडं बहुसंख्य ग्राहकांचा कल असतोच; त्याचबरोबर महागड्या, सहज उपलब्ध नसलेल्या वस्तुंसाठीही भारत मोठी ग्राहक बाजारपेठ आहे. फार प्राचीन काळाच्या मोहात पडून इतिहासात शिरायला नको; अगदी अलिकडच्या म्हणजे उदारीकरणानंतरच्या भारताकडे पाहिलं, तर भारतीय बाजारपेठेची ताकद स्पष्ट दिसते.
भारताच्या ढोबळ उत्पन्नानं दहा वर्षात दुप्पट वाढ दर्शवली आहे. १९९१ ला ढोबळ उत्पन्नाच्या वाढीचा दर एक टक्क्यांपर्यंत घसरला होता. त्यानंतर १९९७, २०००, २००२, २००८ आणि २०२० ही अपवादात्मक वर्षं वगळता देशांतर्गत ढोबळ उत्पन्न सातत्यानं स्थिर अथवा वाढत राहिलं आहे.