

India Mediterranean foreign policy
Sakal
इस्राइल, इजिप्त आणि सायप्रस या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये भारताचा दौरा केला. द्विपक्षीय स्तरावर भारतासाठी या प्रत्येक देशाचे एक वेगळे महत्त्व आहे. पण फक्त दोन महिन्यांत या तीन देशांशी संवाद साधत भारताने आपल्या परराष्ट्रधोरणात एक पाऊल पुढे टाकले आहे, असे म्हणता येईल. इजिप्त आणि सायप्रस हे देश भूमध्य प्रांतात स्थित असल्याने भारताला या प्रांताबरोबरचे आपले संबंध मजबूत करायला मदत होणार आहे. ऐतिहासिक काळापासून भूमध्यसमुद्र किंवा भूमध्य प्रांत जागतिक राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आलेला आहे. पूर्व (आशिया) आणि पश्चिम (युरोप) यांना जोडणारा हा प्रांत असल्यामुळे व्यापार, दळणवळण तसेच युद्ध आणि आक्रमणे अशा घडामोडी भूमध्य प्रांताची ओळख बनल्या आहेत. आठव्या शतकातील युरोपवरच्या इस्लामी आक्रमणापासून ते १९व्या शतकातील ब्रिटन, रशिया आणि फ्रान्स यांच्यातील सामरिक प्रतिस्पर्धेपर्यंत भूमध्य समुद्र हा नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे.