

Indian Economy Growth
esakal
भारत आणि जपान या दोन्ही देशांच्या वाढीच्या दरात आठ टक्क्यांऐवजी फक्त सहा टक्के फरक गृहीत धरला, तरी चार वर्षांमध्ये जर्मनीला मागे टाकून भारताची तिसऱ्या क्रमांकावर पोचण्याची क्षमता निश्चितच आहे. मात्र धोरण योग्य हवे. आधुनिक जगातील एक विस्मयकारी कामगिरी करून दाखविणाऱ्या चीनने अनेक धाडसी आर्थिक सुधारणा करून मोठा पल्ला गाठला आहे. आपल्याला प्रगतिशील धोरण आणि कठोर परिश्रम याचाच आधार आहे.
जगातील वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा क्रमांक वरचा आहे. राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या क्रमवारीमध्ये २०२३ मध्ये इंग्लंडला मागे टाकून भारत पाचव्या क्रमांकावर पोचला. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने २०२५ हे भारताच्या आर्थिक वाढीला अजून सकारात्मक कलाटणी देणारे वर्ष ठरले असून, जपानला मागे टाकून आपण चौथ्या क्रमांकावर पोचल्याची ग्वाही दिली आहे. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ४.१८ ट्रिलियन डॉलरवर पोचले आहे. तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी असून, त्यांची अर्थव्यवस्था ५.०१ ट्रिलियन डॉलरच्या घरात आहे. सप्टेंबर २०२५ च्या तिमाहीमध्ये भारताच्या आर्थिक वाढीचा दर ८.२ टक्के होता. ‘ओईसीडी’ या संस्थेच्या माहितीनुसार, जर्मनीचा वाढीचा दर या तिमाहीतच नव्हे, तर २०२५ या वर्षासाठी शून्य टक्क्याच्याच आसपास रेंगाळला आहे. दोन्ही देशांच्या वाढीच्या दरात आठ टक्क्यांऐवजी फक्त सहा टक्के फरक गृहीत धरला, तरी चार वर्षांमध्ये जर्मनीला मागे टाकून भारत तिसऱ्या क्रमांकावर पोचण्याची क्षमता निश्चितच आहे.