
अनेक नावीन्यपूर्ण फ्लेव्हर्स, सहज उपलब्धता, अखंड वीजपुरवठा, आधुनिक जीवनशैली, चैनीसाठी खर्च करण्याची तयारी यामुळे आइस्क्रीमच्या मागणीला चालना मिळत आहे. जीवनशैलीत बदल झाल्यामुळे महागड्या आइस्क्रीम्सची विक्री लक्षणीयरित्या वाढली आहे आणि आगामी काळातही हा कल वाढण्याची अपेक्षा आहे.
आला उन्हाळा, आइस्क्रीमचा गारवा हवा जिवाला... असे म्हणत प्रत्येकजण उन्हाच्या झळा लागू लागल्या, की आपल्या आवडीचे आइस्क्रीम खात जिवाला थंडावा देण्याचा प्रयत्न करतात. थंडगार, रंगीबेरंगी, वेगवेगळ्या चवींचे आइस्क्रीम खाल्ल्याशिवाय उन्हाळा सार्थकी लागला असे काही वाटत नाही. मुलांसाठी तर उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आइस्क्रीम खाणे आलेच. दरवर्षी उन्हाळ्यात वेगवेगळ्या आइस्क्रीम कंपन्या नवनव्या चवींची, स्वादांची आइस्क्रीम्स आणत असतात.