
India Pakistan trophy drama
esakal
गेला म्हणजेच २८ सप्टेंबरचा रविवार मजेदार होता. आशिया कपचा अंतिम सामना अपेक्षेप्रमाणे भारत विरुद्ध पाकिस्तानदरम्यान रंगणार होता. अगोदर आपण त्यांना आरामात पराभूत केले वगैरे सगळे ठीक आहे; पण ‘अंतिम सामन्यात आपला संघ पचकायला नको. नाहीतर सगळे मुसळ केरात जाईल’, सतत चिंता करणाऱ्या भारतीय चाहत्यांची प्रतिक्रिया बोलकी होती. एक नक्की होते ते म्हणजे अंतिम सामना एकदम एकतर्फी होणार नाही, असे वाटत होते. कारण साधे होते, पाकिस्तान संघ कितीही सामान्य असला तरी त्यांना प्रोत्साहित करायला भारतासमोर सामना ही एकच गोळी लागू पडते.
अंतिम सामन्यात पाकिस्तानी संघ जोरदार प्रतिकार करणार, हे अपेक्षितच होते. झालेही तसेच. अंतिम सामन्यात पाकिस्तानी संघाने जरा सुधारित खेळ केला. जरा दडपण टाकता येऊ लागले दिसल्यावर त्यांचा मूळ घाणेरडा स्वभाव बाहेर येऊ लागला. मैदानावर गोलंदाजी करताना पाकिस्तानी खेळाडू भारतीय फलंदाजांना वाट्टेल ते बोलू लागले. नाबाद फलंदाजांना बोलणे एकवेळ मान्य आहे; पण बाद झालेल्या फलंदाजाला बोलणे म्हणजे निव्वळ षंढपणा वाटतो. पेटून उठलेल्या पाकिस्तानी खेळाडूंना कशाचे भान राहिले नव्हते. त्यांच्या गरम झालेल्या तव्यावर तिलक वर्माने अप्रतिम नाबाद खेळी करून बादलीभर पाणी ओतले. भारताने अंतिम सामना आणि आशिया कप जिंकला. खेळलेले सर्व सामने जिंकत विजेतेपद पटकावल्याने भारतीय संघाचे वर्चस्व दिसून आले.