

Make in India
esakal
भारताने २०४७ पर्यंत विकसित देश होण्याचं उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी आत्मनिर्भरता आणि स्वदेशी वापर यांचा समन्वय साधला जात आहे. हा नवा सांस्कृतिक आणि तंत्रज्ञानाधारित राष्ट्रवाद आहे. गांधीजींच्या काळातील स्वदेशी हे परकीय वस्तूंच्या बहिष्कारावर आधारित होते. जागतिक परस्पर सहकार्य राखून राष्ट्रवादावर आधारित आजची स्वदेशी चळवळ आहे. परकीय तंत्रज्ञानाचा उपयोग करूनही भारतीय नियंत्रण, नवकल्पना आणि मूल्यवृद्धी राखणे असा त्याचा अर्थ आहे.
स्वदेशी’ ही संकल्पना भारताला नवी नाही. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात लोकमान्य टिळकांच्या चतु:सूत्रीमध्ये स्वदेशीचा समावेश होता. त्यानंतर महात्मा गांधींनीही भारतीयांना स्वदेशीचा मंत्र दिला. या दोन्ही स्वदेशी चळवळींचा पहिला उद्देश परकीय शत्रूंशी लढताना त्यांच्या मालावर बहिष्कार टाकणं आणि भारतीय उत्पादनांचा वापर वाढवून, त्याद्वारे देशी उद्योग व्यवसाय जिवंत ठेवणे, पुनरुज्जीवित करणे हा होता. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला स्वदेशीचा नारा यापेक्षा वेगळा आहे. स्वतंत्र भारतात त्याचा संदर्भ बदलला आहे. त्यात परकीय वस्तूंवर बहिष्कार अपेक्षित नाही. उलट जगाच्या सहकार्यातून आणि जगाला सहकार्य करत परस्पर लाभातून स्वदेशी आणि आत्मनिर्भरता अपेक्षित आहे.