
माझी आई जेवढी तिखट स्वभावाची त्यापेक्षाही गोड मनाची होती. मेहनती, प्रामाणिक, सेवाभावी... सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, कुणालाही ‘आपलं’ वाटण्याची ताकद तिच्यात होती. ती फक्त माझीच नाही, तर आमच्या कार्यकर्त्यांचीही आई होती. माझ्या आंदोलनांची प्रेरणा होती, माझ्या राजकीय प्रवासाचा पाया होती... ‘माणसाला जे नाही, त्याची मदत करा आणि जे चुकीचं आहे, त्याविरुद्ध उभं राहा’... हा तिचा मंत्र आजही माझ्या प्रत्येक लढ्यात सोबत आहे.
मामाचं गाव तळवेल... तेथील एक अत्यंत धार्मिक, प्रतिष्ठित बोंडे कुटुंब. त्याच कुटुंबातील माझी आई इंदिरा, बेलोरा गावाची सून झाली. मामाच्या गावात प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावांवरूनच आमची नावं भैया आणि बच्चू ठेवली गेली. आईच्या माहेरच्या संपन्न आध्यात्मिक वारशामुळे तिला अध्यात्म नीट कळत होतं आणि म्हणून ती नेहमी सच्चिदानंद असायची. कोणत्याही कष्टामध्ये तिच्यावर कधी नैराश्य किंवा तिच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया आम्ही कधी पाहिली नाही. कितीही विपरीत परिस्थितीत स्वतःमधील आनंद टिकून ठेवण्यात ती नेहमीच यशस्वी राहिली.