
बाप्पू म्हणजे माझे वडील लहानपणापासून सेवाभावी वृत्तीचे होते. ‘मैत्रीमधला राजा माणूस’ अशी जणू बाप्पूंची मित्रांमध्ये प्रतिमा होती आणि कोणाच्याही अडीअडचणीमध्ये धावून जाणारा हा संवेदनशील मनाचा अन् समाजशील असा बाप... बाप्पूंची समाजाविषयीची तळमळ मनात जनसेवेचं बीज रोवून जात होती. बाप्पूंचं परोपकारी व्यक्तित्व मनाला ताकद देत होतं.
आमचं घर धाब्याचं, मोठ्या मातीचं बांधकाम... आजोबांचा दुग्धव्यवसाय आणि जनावरांची खरेदी-विक्री चालायची; तसंच बलुतेदार-अलुतेदार, गावकरी यांनी घर नेहमी भरलेलं राहायचं. अवघा गोतावळा होता. घरात बाप्पूंनी धान्यासाठी पेव बांधला होता. बाप्पू म्हणजे माझे वडील बाबाराव कडू. ते लहानपणापासून सेवाभावी वृत्तीचे होते. कालौघात परिस्थिती बदलल्यामुळे संपूर्ण कुटुंब शेतीवरच अवलंबून झालं. बाप्पूंनी घोडा विकत घेऊन घरच्या दमनीला जुतून त्याचाच टांगा केला. त्या दमनीने, रेंगीने समाजसेवाच जास्त होत होती. घरी धान्याचा पेव बांधला असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाने राब राब राबून शेतात पिकवलेला दायदाणा त्या पेवात जमा व्हायचा. बाप्पू गावात कोणाच्याही कार्यप्रसंगात धान्य द्यायचे आणि रेंगी तर सर्वांच्या सुख-दुःखात धावत राहायची. गावातील लहान-मोठे सर्व लोक वडिलांना ‘बाप्पू’च म्हणायचे. आम्ही अकरा भावंडं आणि आईसुद्धा त्यांना ‘बाप्पू’ म्हणूनच हाक मारायची.