

Arbitrage Fund Investment
esakal
विशाखा बाग - gauribag7@gmail.com
सध्याच्या अस्थिर शेअर बाजारात गुंतवणूक करताना जोखीम कमी ठेवून परतावा मिळवायचा असेल, तर ‘आर्बिट्राज फंड’ हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. भांडवली बाजारातील तीव्र चढ-उतार आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर कमी जोखमीमध्ये स्थिर परतावा देणाऱ्या ‘आर्बिट्राज फंडा’मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे-तोटे, त्याची कामगिरी आदी बाबींचा घेतलेला हा आढावा...
द्विसदृश परिस्थितीमुळे सध्या जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. भांडवली बाजार घसरला असून, ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सोने-चांदीच्या भावातील वाढही आता कमी होताना दिसते आहे. विशेषतः चांदीचा भाव मोठ्या प्रमाणात घसरला आहे. मात्र, डॉलरच्या किमतीत वाढ होत असल्याने फॉरेक्स आणि करन्सी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होत आहे. तसेच, अमेरिका किंवा इमर्जिंग मार्केट फंडामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना तुलनेने चांगले परतावे मिळताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास घाबरतात.
म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांपैकी ‘आर्बिट्राज फंड’ हा तुलनेने दुर्लक्षित पर्याय आहे. नव्या गुंतवणूकदारांना या फंडाबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे, ते त्याकडे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहत नाहीत. मात्र, अनिश्चित आणि अस्थिर बाजारात ‘आर्बिट्राज फंड’ उपयुक्त ठरतो. ज्यांची जोखीम घेण्याची क्षमता कमी आहे; पण त्यांना इक्विटी मार्केटसारखा परतावा हवा आहे, अशांसाठी हा फंड योग्य आहे. ‘आर्बिट्राज फंड’ प्रामुख्याने हायब्रिड कॅटेगरीमध्ये मोडतो.