
ISRO Gaganyaan
esakal
सोव्हिएत रशियाच्या मदतीने १९७५मध्ये आकाशात झेपावलेल्या ‘आर्यभट्ट’ उपग्रहाने भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) प्रवासाला प्रारंभ झाला. आज हा प्रवास अवकाशस्थानकापर्यंत येऊन पोहोचला आहे. येऊ घातलेल्या ‘गगनयान’ मोहिमेद्वारे इस्रोचे सीमोल्लंघन निश्चित आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात गांधीपर्व सुरू होत असतानाच, कोलकात्याच्या रस्त्यांवर शास्त्रज्ञ एस. के. मित्रा रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने भारताच्या अवकाशपर्वाची मुहूर्तमेढ रोवत होते. पृथ्वीभोवती असलेल्या आयनांबरसंबंधीचा त्यांचा प्रयोग हा भारताच्या भावी अवकाश मोहिमांची पूर्वपीठिका ठरला. नोबेल विजेते शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण आणि मेघनाद सहा यांच्या संशोधनांनी भारताच्या अवकाश संशोधनाची दिशा निश्चित केली. स्वातंत्र्यानंतर डॉ. होमी भाभा आणि डॉ. विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांतून प्रत्यक्ष अवकाश मोहिमांना मूर्त स्वरूप मिळाले.