
दिलीप ठाकूर
पडद्यावरचा चित्रपट प्रेक्षकांना भारीच आवडल्याने समाजात मुरला की काय काय होत जाईल, पसरत जाईल, आवडले जाईल हे चित्रपटसृष्टीच काय, कोणताही फिल्मी ज्योतिषी, चित्रपट अभ्यासक वा विश्लेषक कोणीच सांगू शकत नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटाची न भूतो न भविष्यती अशी अफाट व अचाट लोकप्रियता.
आपल्या देशात पौराणिक चित्रपट हेच निर्मितीचे मूळ आहे. मूकपटापासून बोलपटापर्यंत आणि कृष्णधवल चित्रपटापासून रंगीत चित्रपटापर्यंत आपण वाटचाल केली. त्यात पौराणिक चित्रपटांचे अस्तित्व केवढे तरी. याचे कारण, चित्रपटासाठी वेगळी सामाजिक, कौटुंबिक, विनोदी गोष्ट असणे वा लिहिणे या टप्प्यापर्यंत यायला थोडा वेळ लागला. त्यानंतरही पौराणिक वा संतपट निर्माण होत होतेच. ‘जय संतोषी माँ’ हा चित्रपट त्याच परंपरेतील. मे ते सप्टेंबर या काळात पूर्वी हे पौराणिक चित्रपट प्रदर्शित होत.