

Road Connectivity and Human Development
esakal
नितीन बिनेकर - sakal.avtaran@gmail.com
जम्मू-काश्मीरमध्ये विकासाची चर्चा करताना मोठे पूल, रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधांचे महत्त्वाचे टप्पे ठरत आहेत. मात्र, विकासाचे खरे मोजमाप स्थानिक सामान्य माणसाचे जगणे किती सुसह्य झाले यावरही ठरते. आज चिनाब आणि अंजी खड्ड पुलांमुळे रेल्वे वेगाने धावत असली तरी संपर्क रस्त्यांमुळे डोंगरापलीकडची गावे जवळ आली आहेत. त्यातून केवळ प्रवास सुकर झाला नाही, तर लग्नगाठी जुळण्यापासून मुलांच्या शिक्षणापर्यंत आणि आजारपणात मदत मिळण्यापर्यंत माणसांच्या आयुष्यालाही विकासाची नवी दिशा मिळाली आहे.
चिनाब आणि अंजी खड्ड पुलांची उंची जग मोजेल; पण त्यांच्या परिसरातील रस्त्यांमुळे जोडली जाणारी नाती, शिक्षणाच्या संधी आणि आरोग्यसेवेपर्यंत पोहोचण्याचे मार्ग यांचे महत्त्व वेगळे आहे. कारण काही अंतरे किलोमीटरमध्ये कमी होतात; तर काही अंतरे माणसे एकमेकांपर्यंत पोहोचू लागल्यावरच संपतात. रस्ते जीवनाच्या प्रवासाचा महत्त्वाचा आधार ठरत आहेत.
डोंगरापलीकडे एक गाव दिसत होते. तिथेच मुलाचे घर होते. स्थळ चांगले होते, कुटुंबही पसंत होते; पण मध्ये होती खोल दरी. आडवे येत होते नदी-नाले आणि डोंगरातून जाणारी खडतर वाट. मुलीच्या आई-वडिलांसमोर प्रश्न होता, की त्या गावापर्यंत पोहोचायचे कसे? लग्नानंतर लेकीला माहेरी आणायचे कसे? आणि ती आजारी पडली तर तिच्या मदतीला धावून जायचे कसे?