

Apple Silicon M Series Development
esakal
१) जॉन टर्नस अॅपल कंपनीचे नवीन CEO
तंत्रजगतातील दिग्गज अॅपल कंपनीचे मुख्याधिकारी (सीईओ) टिम कुक यांनी निवृत्तीची घोषणा केली असून त्यांच्या जागी जॉन टर्नस यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते १ सप्टेंबरपासून अॅपलची धुरा सांभाळतील. संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या नेतृत्वामुळे तंत्रभरारी घेणाऱ्या अॅपलचे जागतिक आणि आर्थिक विस्तार करण्याचे श्रेय टिम कुक यांना जाते. तर, अॅपलच्या उत्पादनांचे रचनाकार समजले जाणारे जॉन टर्नस यांच्यापुढे पन्नाशीतील या कंपनीला 'एआय' च्या दिशेने नेण्याचे आवाहन असणार आहे. कूक यांनी गेल्या १५ वर्षांत कंपनीला मोठ्या उंचीवर नेले. नऊ अब्ज डॉलरवरून २०२५ मध्ये कंपनीची उलाढाल ४१६ अब्ज डॉलरवर पोचली. आजारपणामुळे स्टीव्ह जॉब्स यांनी राजीनामा दिल्यानंतर २०११ मध्ये अॅपलची सूत्रे टिम कूक यांच्या हाती देण्यात आली होती.
जॉन टर्नस कोण ?
- पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून १९९७ मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळविलेले टर्नस हे २००१ पासून (स्टीव्ह जॉब्स यांच्या कार्यकाळातच) अॅपलमध्ये दाखल झाले.
- आयफोन, आयपॅड आणि मॅकच्या हार्डवेअर इंजिनिअरिंगमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
- एअरपॉड्स आणि अॅपल सिलिकॉनच्या (एम सिरीज चिप्स) विकासामध्ये त्यांची मोठी भूमिका राहिली आहे.
- त्यांना 'हार्डवेअर मॅन' म्हणून ओळखले जाते.
- पासष्टीतील टीम कूक यांच्याकडून पन्नाशीतील जॉन टर्नस यांच्याकडे सूत्रे येणे हा पिढीतील बदलही आहे.