

Hindi cinema comedy legend
esakal
५० आणि ६०च्या दशकातील हिंदी सिनेमाच्या सुवर्णयुगातील विनोदवीर जॉनी वॉकर यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेला विनोद खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि निर्मळ होता. कुठेही अश्लीलता, शारीरिक व्यंगावरील पाणचटपणा, आचरटपणा अन् अंगविक्षेप त्यात चुकूनही सापडत नाही. ११ नोव्हेंबरपासून त्यांची जन्मशताब्दी सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा...
निरागस अभिजात विनोद जर कुठे पाहायचा असेल तर तो प्रसिद्ध अभिनेते जॉनी वॉकर यांच्या अभिनयात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही! अर्थात गुरुदत्त, बलराज सहानी, अब्रार अल्वी, दिलीपकुमार, ऋषिकेश मुखर्जी, बिमल रॉय आदी सर्जनशील कलावंतांसोबत त्यांचे चित्रपट आणि त्यांचा वावर असल्याने त्यांच्या विनोदाला एक नैसर्गिक कलात्मक उंची मिळाली. जॉनी वॉकर यांनी विनोदाची एक प्रतिष्ठा राखली.
जॉनी वॉकर यांचं खरं नाव बद्रुद्दीन काझी. ११ नोव्हेंबर १९२६ त्यांचा जन्म दिवस. त्यांचं घराणं मूळचं महाराष्ट्रातील संगमनेरचं; पण जन्म इंदूरचा. अब्बा तिथे नोकरीला होते. त्यांची नोकरी गेली आणि संपूर्ण कुटुंबाला मोठ्या गरिबीचा सामना करावा लागला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांचं बालपण गेलं. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी काय काय नाही केलं? मुंबईत बेस्टमध्ये वाहकाची नोकरी केली.