
‘काळवेळ’ कथासंग्रहातील बहुतेक कथा दीर्घकथेच्या अंगाने जाणाऱ्या असल्या तरी वेगळे विषय आणि जीवनदृष्ट्या व्यापक आशयामुळे त्या उजव्या ठरतात. खोल अनुभव देणाऱ्या आशयसंपन्न कथा वाचनीय आणि चिंतनीय झाल्या आहेत.
कथा, ललित लेखन, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारांत हातखंडा असलेले वसईस्थित लेखक स्टीफन परेरा यांचा ‘काळवेळ’ हा कथासंग्रह नुकताच ग्रंथालीतर्फे प्रकाशित झाला आहे. ‘वारमोड’ व ‘पोपटी स्वप्न’ हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध असून, या दोन्ही संग्रहांसाठी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार लाभले आहेत. ‘काळवेळ’ या दहा कथांच्या संग्रहात समकालीन वास्तवाचे प्रतिबिंब पडलेले आपणाला दिसून येते.