

Black Rights Movement USA
esakal
‘‘माझ्या बाळा, गोरे कधीच चुकत नसतात... गोऱ्यांपासून सावध राहा...’’ आईचे हे शब्द कानांत सतत घुमत असतात... पोलिस वस्तीत एका गोऱ्याला तरुणीवर बलात्कार करताना पाहून आरडाओरडा केल्याने आईसमोरच गोळ्या झाडल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेला माझा भाऊ स्मरतो आणि आईचे शब्द सर्वांगाच्या भिंतींवर आदळत राहतात... ‘‘माझ्या बाळा, गोरे कधीच चुकत नसतात. गोऱ्यांपासून सावध राहा... आई माझ्या वयाच्या बाराव्या वर्षी मरण पावली...’’ चाळीशीतला आडव्या बांध्याच्या उंचपुऱ्या दणकट देहयष्टीचा कमाऊ मर्चेरिया मला अज्ञातात दृष्टी स्थिरावून सांगत होता.
My mother bore me on the southern wild,
And I am black, but O! my soul is white,
White as an angel as the English Child,
But I am black as if bereav''d of light.
माझी आई दक्षिणेच्या घनदाट जंगलात बाळंत झाली आणि मी हा असा काळा जन्माला आलो; पण माझा आत्मा शुभ्र आहे!
इंग्रजांचं बाळ एखाद्या देवदूतासारखं गोरं आहे आणि मी इतका काळा, की जणू कायमचा उजेडाला पारखा...
विल्यम ब्लेकची १७९९ची कविता आजच्या कमाऊची व्यथा आणि त्याच्या रंगामागच्या वेदनेवर कोरलेल्या आईच्या शब्दातील भाव अचूक सांगणारी वाटली. कमाऊच्या काळ्या रंगामागच्या वेदनेवर आईच्या भयातून, काळजीतून आलेल्या शिकवणुकीची मोहर ३० वर्षांनंतरही कायम होती. कमाऊला अनेक नावं होती. ‘कमाऊ मर्चेरिया’ हे त्याने तुरुंगातून सुटून आल्यानंतर स्वत: घेतलेलं नाव होतं. आजोबांनी नाव ठेवलं होतं, ‘रॉबर्ट जॉन लुईस.’ एक गुलाम होता पूर्वी या नावाचा, त्याची आठवण म्हणून हे नाव त्याला ठेवलं होतं... पुढे जेलमधील १० वर्षांच्या कालावधील सहकैद्यांनी ठेवलेलं नाव ‘ड्रॅगन’ आणि कमाऊला स्वत:ला आवडणारं नाव ‘Son of Black.’ म्हणजेच ‘काळ्याचं पोर...’