

Tribal woman justice struggle
esakal
विवेक पंडित - pvivek2308@gmail.com
कान्हीबाई मोंडुळाचा संघर्ष केवळ एका महिलेसाठी न्याय मिळवण्याचा लढा नव्हता; तर अन्याय्य जातपंचायतींच्या अमानुष प्रथांविरुद्ध उभ्या राहिलेल्या संघटनेच्या अस्तित्वाचीही परीक्षा होती. कान्हीबाई प्रकरणाने ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समाजातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे भयावह वास्तव उघड केले आणि त्या विरोधातील श्रमजीवी संघटनेच्या ऐतिहासिक संघर्षाला दिशा दिली.
श्रमजीवी संघटना ठाणे जिल्ह्यात वाढत होती, बळकट होत होती. आदिवासी आणि बिगर आदिवासीही संघटनेवरच्या विश्वासाने आपल्या व्यथा-वेदनांची कैफियत मांडायला स्वतःहून संघटनेकडे येत होते. कुठेच प्रश्न सुटला नाही तरी तो संघटनेकडे नक्की सुटेल, असा दृढ विश्वास लोकांच्या मनात निर्माण झाला होता.
दशरथ वळवी हा भिवंडीचा आदिवासी तरुण आदिवासींना संघटित करीत होता. करपटवाडीची कान्हीबाई धर्मा मोंडुळा ही तिचा प्रश्न घेऊन दशरथ वळवीकडे आली. कान्हीबाईने आपल्यावरील अत्याचाराची कैफियत संघटनेसमोर मांडली. तिचं धर्मा मोंडुळासोबत लग्न झालं. त्यांना तीन मुलं झाली. पांडू मेंगाळकडे पावसात आवणीकरिता भात लावायला कान्हीबाई शेतमजुरीस जाई. त्यावरून धर्माला तिचा संशय येई आणि या संशयातून १ ऑगस्ट १९९४ला भरदुपारी बारा वाजता कान्हीबाईची वाडी आणि पांडूची वाडी या मधल्या माळावर या दोघांनाही तिचा नवरा धर्मा, त्याचं कुटुंबीय आणि गावच्या जातपंचायतीने फरफटत आणलं. यात गावचे सरपंचही होते आणि त्या दोघांनाही विवस्त्र करून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली गेली. जातपंचायतीने हाताला मिळेल तो दगड उचलून दोघांना दगडाने ठेचून जीवघेणा मार दिला. लज्जेचा भाग कापून टाकण्याची धमकी दिली. जातपंचायतीने ‘तुझ्या पोटातला गर्भ नेमका कुणाचा होता, नवऱ्याचा की पांडूचा?’ अशा अश्लील प्रश्नांचा भडीमार केला आणि कान्हीबाईचा शारीरिक अन् मानसिक छळ सुरू केला.