
कर्नाटकातल्या मुख्यमंत्रिपदाच्या वादात सध्या काँग्रेसने तात्पुरता तोडगा काढलाय. आता या पदासंदर्भात कसलाही वाद नसल्याचे दोन्ही बाजूंकडून सांगितलं जात आहे. सिद्धरामय्या यांना बदली करून राज्यातली जातीय समीकरण बदलायला काँग्रेस तयार नाही. बिहारच्या निवडणुकीपूर्वी तरी कुठलाही बदल होणार नाही असे अनेकांना वाटतंय. पण पाच वर्षे आता आपलंच सरकार राहील, असे सिद्धरामय्या ठामपणे सांगत आहेत. डी. के. शिवकुमार यांनीही स्पर्धेतून माघार घेतली आहे.
कर्नाटकात सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्रिपदी राहणार हे स्पष्ट झाले आहे. पक्षांतर्गत चढाओढीत पुन्हा एकदा त्यांनी डी. के. शिवकुमार गटावर मात केली, पाच वर्षे आपलंच सरकार राहणार असं ते ठामपणे सांगत होते, तर शिवकुमार सिद्धरामय्या हे आपले नेते आहेत आणि मी त्याच्यासोबत आहे, असं स्पष्ट करत होते.
हे एखाद्या राज्यात नेतृत्वाचा पेचप्रसंग मिटवल्यानंतरचं काँग्रेसमधील टिपिकल चित्र नुकतंच कर्नाटकमध्ये दिसलं. म्हणून पक्षात सारं आलबेल आहे आणि दोन नेत्यांत आता कसलेच मतभेद-संघर्ष-स्पर्धा नाही यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असल्याचं सांगतानाच माझ्यासमोर दुसरा पर्यायच काय, असं शिवकुमार म्हणत होते ते पुरेसं बोलकं होतं. काँग्रेसमधील हा कर्नाटकी घटनाक्रम तिथल्या रस्सीखेचीत पक्षश्रेष्ठींनी तूर्त पडदा टाकण्यात यश मिळवलं एवढंच दाखवतो, मात्र तो अर्धविरामच आहे हे उघड आहे.