
प्रा. युगांक गोयल,
विद्यार्थिनी कृती भार्गव,
जम्मू-काश्मीरमध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. यामुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव पुन्हा उफाळून आला. या ताज्या घटनेने संघर्षाची ठिणगी पडली आहे. भारत-पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रांतील संबंधांचा इतिहास तणाव अन् संघर्षमय आहे. युद्धे, शस्त्रसंधी आणि सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा सातत्याने प्रभाव जाणवतो. ‘दक्षिण आशिया दहशतवाद पोर्टल’वरील माहितीच्या आधारे केलेले विश्लेषण.
दक्षिण आशिया दहशतवाद ‘पोर्टल’ला (एसएटीपी) ही संस्था २००० मध्ये स्थापण्यात आली. ती ‘इन्स्टिट्यूट फॉर कॉनफ्लिक्ट मॅनेजमेंट’ या संस्थेमार्फत चालवली जाते. हे ‘पोर्टल’ दक्षिण आशियामधील दहशतवाद अन् संघर्षांवर आधारित सर्वांत मोठे आणि विश्वासार्ह माहितीस्त्रोत मानले जाते. २०२० पर्यंत ‘एसएटीपी’कडे ९५ हजारांहून अधिक पाने माहिती उपलब्ध होती आणि आजही हे ‘पोर्टल’ सतत अद्ययावत ठेवले जाते. यात दररोजचे घडामोडी वृत्त, संघर्ष विश्लेषण, आकडेवारी, दहशतवादी संघटनांची माहिती अन् महत्त्वाच्या दस्तावेजांचा समावेश असतो. या लेखात आम्ही ‘एसएटीपी’ने दिलेल्या माहितीचा वापर करून भारतातील दहशतवादी हल्ल्यांची दिशा अन् त्यामागच्या प्रवाहांचा अभ्यास केला आहे. त्यातही दहशतवादाने सर्वाधिक ग्रस्त जम्मू-काश्मीरवरच भर दिला आहे.