

Passsover festival history
esakal
माझ्या आयुष्यात संघटनेच्या आजवरच्या प्रवासात कॅथी श्रीधर ही इजिप्तमधल्या दहाव्या पीडेवेळी इस्रायलींच्या घरावरून मायेची शाल पांघरणाऱ्या देवासारखी आहे. कॅथी म्हणजे माझ्यातल्या आणि संघटनेच्या संघर्षासाठीच्या अव्याहत ऊर्जेचा स्रोत असणारी ‘मायेची शाल’ आहे, जिला ओलांडून मला संघटनेचा विचारच करता येऊ शकत नाही. माझ्यावरील आणि संघटनेवरील कॅथीचं ऋण शब्दातीत आहे.
मॅगीद म्हणजे ज्यूंच्या ‘पासओव्हर’ (Passover) सणाच्या रात्री सांगितल्या जाणाऱ्या हागादा (Haggadah) या प्रार्थना पुस्तकातली ज्यूंची ईजिप्तमधून झालेल्या मुक्तीची कहाणी... ज्यू - (बेने इस्राईल) परंपरेमध्ये या कहाणीचं फार महत्त्वाचं स्थान आहे.
फॅरो म्हणजे देवासारखा राजा... ‘फॅरो’ ही प्राचीन इजिप्तच्या सर्व राजांना दिलेली पदवी होती. फॅरो म्हणजे जिवंत देव मानले जात. ते सूर्याचे पुत्र मानले जात आणि इजिप्तमध्ये सत्य, न्याय टिकवणं हे त्यांचं प्रमुख काम असे. यातला एक फॅरो हा क्रूर होता. त्याने इस्रायलींना गुलाम बनवलं आणि त्यांचा छळ सुरू केला.
ॲडवोकसी इन्स्टिट्यूट या वॉशिंग्टनमधील संस्थेत धोरणात्मक पातळीवर काम कसं करावं? या संदर्भात प्रशिक्षण घेण्यासाठी कॅथी श्रीधरने मला अमेरिकेत आग्रहाने आमंत्रित केलं होतं. त्यावेळी कॅथीच्या वॉशिंग्टन डी. सी. येथील घरी एका संध्याकाळी डेव्हिड कोहेन आणि त्यांची पत्नी कार्ला, ॲलन निसेनबाम आणि जेम्स कॉलमन तसेच कॅथीच्या दोन मुली अनिता, छोटी सुझी आणि तिचा मुलगा देव, असे आम्ही एकत्र जमलो होतो. त्यावेळी आम्ही ‘पासओव्हर’ हा ज्यूंचा सण साजरा करत होतो. डेव्हिड, ॲलन, कार्ला, जेम्स, कॅथी हे सर्वच ज्यू धर्मीय आहेत. ज्यू धर्मामध्ये नवीन वर्षाचा ‘पासओव्हर’ हा सण साजरा केला जातो, त्यामागची कहाणी कॅथी आम्हाला सांगत होती. या इस्रायलींपैकी कुणी नेता बनेल, या भीतीने क्रूर फॅरोने नवजात बालकांना ठार मारायला सुरुवात केली.