
मॉन्सूनच्या आगमनाची चाहूल लागली की बऱ्याचशा गोष्टी आपसूक घडायला लागतात. हल्ली जवळपास प्रत्येकाची एक गाण्यांची ‘मॉन्सून प्लेलिस्ट’ असतेच. त्या लिस्टच्या सुरुवातीलाच वाजणारं गाणं असतं ‘१९४२-अ लव्ह स्टोरी’ सिनेमातलं ‘रिमझिम रिमझिम’. मिलेनियल पिढीसाठी पावसाची सुरुवात छत्र्या आणि रेनकोट उघडण्याआधी या गाण्याने होते. याचं श्रेय जितकं गाणं संगीतबद्ध करणाऱ्या आरडी बर्मनचं, तितकंच गाण्याला आवाज देणाऱ्या कुमार शानूचं आणि कविता कृष्णमूर्तीचं; पण पावसाचं, कविता कृष्णमूर्तीचं आणि मिलेनियल पिढीच्या भावविश्वाचं नातं इथंच संपत नाही. मणिरत्नमच्या ‘बॉम्बे’मध्ये असाच मुसळधार पाऊस पडतोय. कॅमेऱ्यात टिपला जाणारा देखणा समुद्र तितक्याच सुरात गरजतोय. त्यात कविता कृष्णमूर्तीचा मधाळ आवाज ऐकू येतोय. ‘सजना, सजना, आज आंसू भी मीठे लगे’. आणि मग हरिहरन पुन्हा आर्त स्वरात आळवतोय ‘तू ही रे, तू ही रे’.