
सुनील चावके
नजीकच्या भविष्यात देशाच्या राजकारणात काही तरी मोठे आणि अकल्पित घडेल, असे स्वप्नरंजन करणाऱ्यांना खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच आपल्या भाषणातून खाद्य पुरवले आहे. त्यांचे लाल किल्ल्यावरील प्रदीर्घ भाषण आत्मनिर्भरतेचा पुरस्कार करणारे आणि संरक्षणविषयक आव्हानांचा परामर्श घेणारे होते.
ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन सलग बाराव्या वर्षी देशवासीयांना संबोधित करताना यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक आणि संरक्षणाच्या आघाड्यांवरील भारतापुढच्या आव्हानांचा परामर्श घेतला. त्यांचा विचार केल्यास येणारा कालखंड देशवासीयांना खडतर ठरू शकतो. देशाचे नेतृत्व करताना अशा संघर्षाच्या कालखंडाची जाणीव करुन देणे गरजेचे असते. देशवासीयांना काळजी वाटणार नाही, अशा भाषेत पंतप्रधान मोदी यांनी भारतापुढच्या आव्हानांची यादीच यावेळी सादर केली.