

Khanderi Fort
esakal
खांदेरी किल्ला उत्तर कोकणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सत्तेचा मानबिंदू आहे. मुंबईकर इंग्रजांवर खांदेरीने वचक निर्माण केला. सिद्दी आणि इंग्रजांच्या अमानुष सत्तेला सुरुंग लावण्याचे ऐतिहासिक कार्य खांदेरी किल्ल्याने केले. खांदेरी किल्ला भूमिपुत्रांच्या स्वातंत्र्याचा जयघोष आहे. तो जंजिऱ्याच्या उत्तरेला आहे. म्हणजे इंग्रज आणि सिद्दीच्या बालेकिल्ल्यात जाऊन स्वतःचा किल्ला बांधायचा शिवाजी राजांचा निर्धार खूपच क्रांतिकारक होता.
ज्याची समुद्रावर सत्ता त्याची देशावर सत्ता’... देश सुरक्षित ठेवायचा असेल; तर समुद्रकिनारा ताब्यात ठेवणे अत्यावश्यक आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले; परंतु समुद्रावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सागरी किल्ले आणि आरमार असणे अत्यावश्यक होते. त्यामुळेच महाराजांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्ग हे सागरी किल्ले बांधले. स्वतःचे आरमार निर्माण केले. पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रजांनी सुरतपासून गोव्यापर्यंत समुद्रकिनाऱ्यावर थैमान घातले होते. व्यापारी आणि प्रवासी वाहतुकीवर त्यांचे नियंत्रण होते.
सागरी सत्तेच्या बळावर कोकणातील स्थानिक प्रजेवर सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज अन्याय-अत्याचार करत असत. भूमिपुत्रावर होणारा अन्याय पाहून महाराजांनी या परकीय सत्तांना धडा शिकवायचा निर्धार केला. सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज यांची अनियंत्रित सत्ता समुद्रावर होती. या सागरी सत्तेसाठी सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज यांचा अंतर्गत संघर्ष होता; परंतु स्थानिक मराठा सत्तेच्या तिघेही विरोधात होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सागरी सत्तेचे महत्त्व ओळखून सागरी किल्ले बांधण्यास सुरुवात केली, तेव्हा मात्र हे तिघेही त्यांच्या विरोधात उभे राहिले. ‘ज्याचे आरमार, त्याचा समुद्र’ या सूत्रानुसार महाराजांनी स्वतःचे आरमार उभारले.