
मैत्रेयी पंडित-दांडेकर
विमानतळावर पोहोचताक्षणी मला माझं माकड जीजीच्या घरी विसरल्याची जाणीव झाली. माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि दुसऱ्या सेकंदाला मी संबंध पुणे एअरपोर्ट डोक्यावर घेतलं. माझा आक्रोश बघून मला पळवून आणलंय की काय असं आजूबाजूच्या काही काकूंना वाटू लागलं.
तर त्याचं झालं असं, की माझ्या पहिल्या वाढदिवसाला माझ्या आत्यानं मला एक मऊ मऊ, मळकट रंगाचं गोंडस माकड भेट दिलं. त्याला हातात धरताक्षणीच माझं लव्ह ॲट फर्स्ट साइट का काय म्हणतात तसं झालं आणि त्या दिवसापासून आम्ही दोघं एकमेकांची असलेली आणि नसलेली शेपूट धरून गुण्यागोविंदानं एका छताखाली नांदू लागलो.