esakal | अगुंबे : दक्षिण भारताची ‘चेरापुंजी’
sakal

बोलून बातमी शोधा

अगुंबे : दक्षिण भारताची ‘चेरापुंजी’}

अगुंबे : दक्षिण भारताची ‘चेरापुंजी’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-संजय उपाध्ये

भारतात सर्वांत जास्त पाऊस मेघालय राज्यातील चेरापुंजी येथे पडतो. त्यानंतर देशात आणखी एक ठिकाण आहे, की जेथे चेरापुंजीच्या तोडीस तोड असा झिम्माड पाऊस कोसळतो. कर्नाटकाच्या शिमोगा जिल्ह्यातील अगुंबे (ता. तीर्थहळ्ळी) येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या पावसाची नोंद झाली आहे. येथे वर्षभरात सुमारे ८,००० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. कर्नाटकात पश्‍चिम घाटाचा (सह्याद्री पर्वतरांग) मोठा भाग येतो. बेळगाव, कारवार, धारवाड, उडुपी, शिमोगा, चिक्कमंगळूर, हासन, कोडगू या जिल्ह्यांतील काही भाग पश्‍चिम घाटात मोडतो. त्यापैकी ‘मलनाड’ भागात दरवर्षी मोठा पाऊस होतो. मलनाड (कन्नडमध्ये ‘पावसाचा प्रदेश’) भागातील घनदाट जंगलात डोंगररांगांवर चिमुकले अगुंबे गाव वसले आहे. अगुंबे गाव अत्यधिक पावसामुळे ‘दक्षिण भारताचे चेरापुंजी’, ‘कर्नाटकाची वर्षा राजधानी’, ‘कर्नाटकातील सर्वांत ओले ठिकाण’ अशा विशेषणांनीही ओळखले जाते.

महिन्यात साडेचार हजार मिलीमीटर पाऊस!

अगुंबे पश्‍चिम घाटाच्या पर्वतरांगेतील एक छोटे गाव आहे. शहरीकरणापासून गाव लांब असल्याने तेथे मर्यादितच सुविधा आहेत. अगुंबेची लोकसंख्या अवघी ५०० आहे तर गावाचे क्षेत्र केवळ तीन चौरस किलोमीटर आहे. समुद्रसपाटीपासून गाव ८२३ मीटर उंचीवर आहे. अगुंबे गावात फेब्रुवारीतही पाऊस पडल्याची नोंद आहे. सर्वांत कमी पावसाचा महिना फेब्रुवारी आहे तर सर्वांत जास्त पाऊस जुलैमध्ये होतो. जुलैमध्ये एका महिन्यात सरासरी २,६४७ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. तर वार्षिक सरासरी ७,६२० मिलीमीटर (३०० इंच) इतका पाऊस पडतोच. तर आतापर्यंत एका महिन्यात सरासरी ४,५०८ मिमी (१७७.५ इंच) इतका पाऊस झाल्याची ऑगस्ट १९४६ ची नोंद आहे. त्यातूनच येथे भारतातील पहिली स्वयंचलित वेधशाळा (ऑटोमॅटिक वेदर स्टेशन) उभारण्याचे श्रेय पर्यावरणप्रेमी रॉमलस व्हिटकर यांना जाते. हरित वर्षावन भागात अगुंबे वसले आहे. तसेच विषुववृत्तीय वातावरण, उष्ण आणि आर्द्रता असे हवामानही येथे असते. त्यामुळे घनदाट चंदेरी धुके नेहमी अगुंबेच्या परिसरात पाहायला मिळते. येथील अगुंबे घाटही प्रसिद्ध आहे. या घाटातही मॉन्सूनच्या काळात धुवाँधार पाऊस कोसळत असतो.

हेही वाचा: कॉफीमुळे तु्म्हाला थकवा येतो का? जाणून घ्या कारणे आणि उपाय

जागतिक वारसास्थळाचा मान

पश्‍चिम घाटाचा भाग असल्यामुळे अगुंबेला साहजिकच जागतिक वारसास्थळाचा सन्मान प्राप्त झाला आहे. अगुंबेच्या जवळच सोमेश्‍वर अभयारण्य तर कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान आहे. अगुंबेइतकाच झिम्माड पाऊस कर्नाटकात आणखी काही ठिकाणी पडतो. पश्‍चिम घाटातील अगुंबेजवळील हुलिकल्ल (जि. शिमोगा), आमगाव (जि. बेळगाव), तळकावेरी (जि. कोडगू), कोकळ्ळी, कॅसलरॉक, नीलकुंड (तीनही जि. कारवार) येथील पावसाची सरासरीही अगुंबेशी स्पर्धा करते. यापैकी बेळगाव जिल्ह्यातील आमगाव येथे २०१० ला तब्बल १०,०६८ मिलीमीटर इतक्या प्रचंड पावसाची नोंद झाली आहे आणि ही नोंद कर्नाटकाच्या आजवरच्या पावसाचा उच्चांक आहे. मंगळूरपासून ९८ किलोमीटर अंतरावर अगुंबे आहे, तर बंगळूरहून ३५७ किलोमीटर अंतर आहे. किनारपट्टीवरील उडुपी येथे जवळील रेल्वेस्थानक आहे. तर जवळील विमानतळ हे बाजपे (मंगळूर) येथे आहे. रस्ते, विमान आणि रेल्वेने अगुंबे जगाच्या इतर भागाशी जोडले गेले आहे. त्यामुळेच येथे पर्यटकांचा वर्षभर राबता असतो. त्यातूनही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे महिने अतिशय आल्हाददायक असतात. हिरवा निसर्ग, खळाळते नाले, धबधबे आणि रम्य हवामान यामुळे मन उल्हसित होऊन जाते.

हेही वाचा: माय टूर : शानदार पॅलेस इस्टेट, पाक सिमेवरील लखपतचा नजरा

पाऊस वाढतच चाललाय!

पश्‍चिम घाटातील मॉन्सून पावसाचे प्रमाण अनेक वर्षे जवळपास स्थिर होते; पण गेल्या काही वर्षांत तेथे पाऊस पडण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. गोल्बल वॉर्मिंग किंवा हरित वायूचा परिणाम येथेही दिसून येऊ लागला आहे. त्याचा फार मोठा परिणाम होत आहे, असे गेल्या तीन-चार वर्षांतील आकडेवारी सांगते. २०१६ मध्ये ६,१५१ मिलीमीटर पाऊस अगुंबे येथे झाला. २०१७ ला ६,२७६ मिलीमीटर तर २०१८ ला तब्बल ८,२०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वर्षाची सरासरी आता ७,६२४ मिलीमीटर इतकी झाली आहे. पण पावसाची वार्षिक सरासरी काढताना तब्बल ५० वर्षांतील पावसाच्या नोंदी घेतल्या जातात. त्यावरून लक्षात येते, की अगुंबे आणि कर्नाटकाच्या पश्‍चिम घाट प्रदेशातील पावसाचे प्रमाण वर्षागणिक वाढतच चालले आहे. त्यामुळे पूर, भूस्खलन, झाडांच्या मुळाखालील जमीन निघून जाणे, जंगलप्रदेश कमी होणे असे धोके दिसून येत आहेत.

हेही वाचा: हवा कायद्याचा धाक, महिलांना संरक्षण

धबधबे, सूर्यास्त, ट्रेकिंग

अगुंबेतील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. शेतकरी भात आणि सुपारी ही पिके घेतात. सगळा जंगलप्रदेश असल्यामुळे शेती यथातथाच असते. त्यामुळे तेथील शेतकरी गरीबच आहे. रक्षा कवच व्हिवर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीने तेथील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कुटिरोद्योग सुरू केले आहेत. अगुंबेच्या परिसरात कुंडद्री, कोडचाद्री हिल्स, उडुपी, कारकळ, कोळ्ळुरु, श्रींगेरी, चिक्कमंगळूर, शिमोगा, भद्रावती, एन. आर. पुरा, होसनगर आणि तीर्थहळ्ळी ही पर्यटनस्थळे आहेत. याबरोबरच बरकाना, ओनके, जोगीगुंडी, कुडलूतीर्थ, सिरीमने हे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. सूर्यास्त पाहण्यासाठीही अगुंबे प्रसिद्ध आहे.

दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका पॉईंटवरून अरबी समुद्रात बुडणाऱ्या सूर्याचे अतिसुंदर दृश्‍य दिसते. खास हा सूर्यास्त पाहण्यासाठीच पर्यटक येथे येत असतात. अगुंबेची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. वर्षाजल संग्रह, औषधी वनस्पतींचे दस्तावेजीकरण, पर्यटन (ट्रेकिंग आणि फोटोग्राफी) तसेच कुटिरोद्योगासाठीही अगुंबे प्रसिद्ध आहे.

हेही वाचा: सिंंधुदुर्गच्या पाऊलखुणा : 'सावंतवाडी' गेले ब्रिटिशांच्या हाती

किंग कोब्राचे आश्रयस्थान

अगुंबे रेनफॉरेस्ट रिसर्च स्टेशनही येथे आहे. त्याशिवाय देशातील एकमेव असे नागराज अभयारण्यही (किंग कोब्रा सँक्चरी) येथे आहे. पश्‍चिम घाटातील पाऊस, हवामान, आर्द्रता आणि इतर पोषक वातावरण असल्याने नागराजाचे हे आश्रयस्थान बनले आहे. नागराजाचे अस्तित्व असल्यामुळे जंगल सशक्त आहे. अन्नसाखळीत नागराज अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे येथील जंगलाला सुदृढता लाभली आहे. त्यामुळे भारताचे महान सर्पतज्ज्ञ होमलस व्हिटकर यांनी येथे किंग कोब्रा अभयारण्य बनविण्यासाठी अतिशय मेहनत घेतली आहे. १९७१ ला त्यांनीच पहिला किंग कोब्रा येथेच पकडला होता. त्यातूनच आपल्या संस्कृतीत अतिशय महत्त्वाचे स्थान मिळालेल्या नागसर्पाला सुरक्षा मिळावी, त्याचे संवर्धन व्हावे तसेच त्याचा अभ्यासही होत राहावा, यासाठी या अभयारण्याचा उद्देश आहे.

पर्यावरणप्रेमी आणि सर्पतज्ज्ञ गौरीशंकर यांच्यासारखे इतर अनेक नागरिक येथील अभयारण्याशी संलग्न आहेत. गौरीशंकर यांनी आजपर्यंत नागरिकांच्या घरात घुसलेले तब्बल शंभरावर नागसर्प जवळच पण सुरक्षित ठिकाणी सोडले आहेत. तर दोनशेवर नागसर्पाची पिलेही सुरक्षित ठिकाणी पोचवली आहेत. नागसापांच्या या ठिकाणाला वाचविण्यासाठी वाहने शंभर मीटर दूरच थांबविली जातात. नागरिकही या ठिकाणाला जपतात. नागच नव्हे, तर येथे आढळणाऱ्या वानर, मोठी खार, पक्षी यांना इजा पोहचवत नाहीत. वारुळालाही धक्का लावत नाहीत. एकूणच तेथे नागसर्प, विविध पक्षी आणि माणूस यांचे सहजीवन पाहायला मिळते.

अगुंबेत गेल्या अकरा वर्षांत झालेल्या पावसाच्या नोंदी अशा : (सर्व आकडे मिलीमीटरमध्ये)

२०१०--६,९२९

२०११--७,९२१

२०१२--६,९३३

२०१३--८,७७०

२०१४--७,९१७

२०१५--५,५१८

२०१६--६,१५१

२०१७--६,२७६

२०१८--८,२०८

२०१९--७,६२०

२०२०--६,५८३

go to top