
सचिन भोसले
कोल्हापूर हे नाव उच्चारले की नजरेसमोर उभा राहतो तो रांगडेपणा. येथील कुस्ती, फुटबॉल मैदाने जेव्हा खचाखच भरतात, तेव्हा फक्त कोल्हापूरच्या दिलखुलास रांगडेपणाचे दर्शन होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, श्री अंबाबाई, श्री जोतिबा यांच्यापाठोपाठ कोल्हापूरचा खेळ अभिमान सांगणारा आहे.
विविध क्रीडा प्रकारांमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी दाखविलेली रग अवघ्या जगाने पाहिलेली आहे, त्यासाठीचे कष्ट पाहिलेले आहेत. हे शहर ‘क्रीडापंढरी’ हे बिरुद अभिमानाने मिरवते आणि खेळाच्या मैदानात आपल्या रांगडेपणाचा अमिट ठसा ठळकपणे उमटवते.