
टालियन प्राडा कंपनीने नुकत्याच एका फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चपलेला आपले प्रॉडक्ट म्हणून सादर केले आणि त्याचा वाद चांगलाच रंगला. त्यांनी जीआय टॅगिंगच्या नियमाचे उल्लंघन केल्याचेही म्हटले जात आहे, परंतु असा नियम सद्यःस्थितीत फक्त भारतापुरता मर्यादित आहे. सर्वत्र टीका होत असल्याने आता ‘प्राडा’ने २७ जून रोजी चेंबर आॅफ काॅमर्सच्या अध्यक्षांना एका पत्राद्वारे कळवले, की आम्ही हे मान्य करतो की आम्ही आमच्या शोममध्ये लेदर सॅण्डल म्हणून जे दाखवलं होतं, ती कोल्हापुरी चप्पलच आहे. त्यानंंतर ‘प्राडा’ने दाखवलेली लेदर सॅण्डल खरेच कोल्हापुरी चप्पल आहे का, असा प्रश्न पडतो. प्राडा म्हणजे जगप्रसिद्ध इटालियन फॅशन ब्रँड. तो त्यांच्या लक्झरी प्रॉडक्टसाठी ओळखला जातो; पण त्यांनी आपल्या लेदर सॅण्डलला ‘कोल्हापुरी चप्पल’ असेच नाव दिले पाहिजे, असे मत व्यक्त होत होते. ‘प्राडा’च्या कबुलीजबाबामुळे कोल्हापुरी चपलेचा साज पुन्हा एकदा जगात दिमाखानेे मिरवू लागला आहे.
पाहायला गेले, तर कोल्हापुरी चपलेचा इतिहास खूप प्राचीन आहे. कोल्हापूरचे कारागीर पिढ्यान्-पिढ्या त्या बनवत आहेत. जसे माणसाला कान, टाच, कंबर, अंगठा आणि पट्टा असतो तसेच खऱ्याखुऱ्या कोल्हापुरी चपलेतही असते. अस्सल कोल्हापुरी चपलेत मूलभूत तीन गोष्टी असतात. टी-शेप स्ट्रॅप म्हणजे पट्टा, अंगठा आणि कान. जर तुम्ही ‘प्राडा’ने बनवलेले लेदर सॅण्डल बघितले तर त्यालाही टी-शेप स्ट्रॅप, अंगठा आणि कान आहेत. ते लेदर सॅण्डलना नसतात. म्हणून ‘प्राडा’ने बनवलेली लेदर सॅण्डल कोल्हापुरी चप्पलच आहे. त्याची डिझाइन कोल्हापुरी चपलेमधलाच एक प्रकार आहे. त्याचे खरे नाव ‘मोजेपुडा कापशी कोल्हापुरी चप्पल’ असे आहे.