Lata Mangeshkar and Hridaynath Mangeshkar
esakal
हृदयनाथ मंगेशकर - saptrang@esakal.com
लतादीदींनी हृदयनाथांना हाक मारल्यावर ते उठले आणि रक्षाबंधनाचा दिवस साजरा झाला, मात्र त्या दिवशी घरात वेगळेच वातावरण होते. राख्या आणण्यासाठी घरातील पूजेतील चांदीचे नाणे खर्चावे लागले होते. दीदी आणि हृदयनाथ व माईंच्यामध्ये वेगळाच संवाद घडला. काय घडलं त्या दिवशी, सांगताहेत
स्वतः पंडितजी...
मी हसून म्हणालो.
‘‘दीदी ! मघा झोप आली होती, पण आता
मी जागा आहे.’’
आई घाईघाईने म्हणाली.
‘‘लता ! तू उगाच घाबरतेस, छान आहे तो.
मीना चल, आता तू बाळला राखी बांध,
मग आशा, उषा, तुम्ही राखी बांधा.
बाळ ! यांनी राखी बांधली की यांना
रक्षाबंधनाचा एक एक रुपया दे
आणि मग यांच्या पाया पड.’’
मीनाताई, आशाताई, उषाताई या साऱ्यांनी
मला राखीचे धागे बांधले. माझा हात भगव्या
रंगाच्या राख्यांनी भगवा झाला. आधीच मी
अशक्त, त्यात आजारी आणि त्यात उपासमार,
त्यामुळे माझा अशक्त हात
कोपऱ्यापर्यंत राख्यांनी बांधला गेला आणि
मला तो जड, जड भासू लागला.
मी कंटाळून आईला म्हणालो,
‘‘हे काय, माझा सारा हात बांधून टाकला !
सारा हात लाल पिवळा झाला, सोड हे
लाल पिवळे धागे."
अचानक आई गंभीर झाली. नरम स्वरात
म्हणाली,
‘‘बाळ ! हे साधे धागे नाहीत. हे सोडून
सोडवता येणार नाहीत, हे तोडून तुटणार
नाहीत. तू भाग्यवान आहेस, तुझ्यावर
आईसारखं प्रेम करणाऱ्या चार बहिणी तुला
मिळाल्या आहेत. तू यांचं रक्षण करायचंस,
आज राखीपौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन दिवस.
भावाला राखी बांधून बहीण सांगते,
‘‘या पुढे तू माझे रक्षण करायचे,
मी कुठल्या संकटात सापडले, तर तू त्या
संकटातून मला वाचवायचे."