

Geographical Coordinates
esakal
लेखक : सागर रेपाळे
अक्षांश (Latitude) आणि रेखांश (Longitude) यांना भौगोलिक निर्देशांक (Geographical Coordinates) असेही म्हणतात. पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान, अंतर आणि दिशा अचूकपणे निश्चित करण्यासाठी या काल्पनिक रेषांचे जाळे वापरले जाते. अक्षांश व रेखांश हे अंश (°) मध्ये मोजले जातात. प्रत्येक अंशाचे ६० मिनिटे (') आणि प्रत्येक मिनिटाचे ६० सेकंद (") असतात.
अक्षांश म्हणजे पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे विषुववृत्तापासून (Equator) उत्तर किंवा दक्षिण दिशेतील कोनीय अंतर होय. अक्षांश रेषा विषुववृत्ताला समांतर असतात आणि समान अक्षांश असलेल्या बिंदूंना जोडणाऱ्या रेषांना समांतर रेषा (Parallels) म्हणतात. विषुववृत्त पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे दोन भाग करते. दोन अक्षांशांमधील सरासरी अंतर सुमारे १११ कि.मी. असते.
विषुववृत्त (०°) हा अक्षांश मोजण्याचा प्रारंभबिंदू असून तो पृथ्वीवरील सर्वात मोठा अक्षांश आहे. येथे वर्षभर उष्ण व दमट हवामान असते आणि दिवस-रात्रीची लांबी जवळजवळ समान राहते. कर्कवृत्त (२३.५° उत्तर) हे सूर्याच्या किरणांचा लंबवत पडणारा सर्वात उत्तरेकडील अक्षांश आहे. २१ जून रोजी सूर्य कर्कवृत्तावर लंबवत असतो. मकरवृत्त (२३.५° दक्षिण) हे सूर्याच्या किरणांचा लंबवत पडणारा सर्वात दक्षिणेकडील अक्षांश असून २२ डिसेंबर रोजी सूर्य त्यावर लंबवत असतो. आर्क्टिक वृत्त (६६.५° उत्तर) येथे उन्हाळ्यात ‘मिडनाइट सन’ ही घटना दिसते, म्हणजे २४ तास सूर्य क्षितिजावर दिसतो. अंटार्क्टिक वृत्त (६६.५° दक्षिण) हे दक्षिण गोलार्धातील अशाच प्रकारच्या घटनेसाठी ओळखले जाते.