
घोडचूक केली आहे तुम्ही. साधी चूक नाही, भान हरवलं होतं का तुमचं? कशाच्या धुंदीत होतात एवढे? मी म्हणतो, अशी चूक होऊच कशी शकते?.... माझ्या समोर उभी असलेली व्यक्ती दैवी किंवा राक्षसी प्रचंड ऊर्जा मिळाल्यासारखी माझ्याशी बोलत होती. मी बिचारा हरलेल्या अवस्थेत त्याच्या समोर कस्पटासमान उभा होतो. पुन्हा त्याच्यामध्ये शक्ती संचारली.
मान्य आहे की चुका होतात माणसाकडून; पण ही अशी चूक?
माफ करा, झाली भावनेच्या भरात माझ्याकडून...
मी हात जोडून विनंती करत म्हणालो.
भावनेच्या भरात?! काय हो, फक्त तुम्हालाच आहेत का भावना? आं... सांगा... आम्हाला नाहीत का? आम्ही जातो का कधी वाहत भावनेच्या भरात? छे छे... भावनेने आपल्यावर स्वार होणं म्हणजे गुलामीचं लक्षण आहे हे. मागचा-पुढचा विचार राहू द्या किमान आपल्या कुटुंबाचा, बायकोचा, मुलांचा तरी विचार करायचा. काय आदर्श घ्यायचा तुमच्या मुलांनी तुमच्याकडून? हा असा आदर्श...