
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, कर्तृत्व, शौर्य आणि पदस्पर्शाने पावन झालेला लोहगड म्हणजे ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. नुकताच या गडाचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये झालेला आहे. अत्यंत मजबूत, आल्हाददायक आणि प्रेरणादायक गड म्हणून लोहगडाची ख्याती आहे. हा गड स्थापत्यशास्त्राचा अनमोल ठेवा आहे.
लोहगड हा गिरीदुर्ग प्रकारात येतो. या गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ३४०० फूट आहे. हा सह्याद्री पर्वताच्या माथ्यावर आहे. या गडाला लागूनच विसापूर हा गड आहे. किंबहुना विसापूर हा लोहगडाचा जोडकिल्ला आहे. लोहगडाच्या संरक्षणासाठी विसापूर गडाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. लोहगड हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असून लोणावळ्यापासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावर आहे. हा गड पुणे ते मुंबई महामार्गावर मुंबईपासून सुमारे शंभर किलोमीटर तर पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे. लोणावळा आणि मळवली हे लोहगडासाठी जवळचे रेल्वेस्थानक आहे.