

Maharashtra Drought
esakal
अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशीव, बीड या सहा जिल्ह्यांतल्या विशेषतः पूर्व भागातल्या जमिनीची परिस्थिती भीषण आहे. इथली जमीन कोरडीठाक पडते आहे. धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुण्याचा पूर्व भाग, जालना या पाच जिल्ह्यांमधल्या जमिनीतला कोरडेपणाही धोकादायक परिस्थितीला पोहोचला आहे. कोरड्या शिवारांत फक्त अश्रूंचेच बांध फुटले आहेत...
दुष्काळ नैसर्गिक संकट आहे. ते अन्य संकटांपेक्षा वेगळे आहे. कारण, या संकटाची सुरुवात संथ होते आणि महिनोन् महिने किंवा अगदी काही वर्षे ते विस्तारत जाते. व्यापक क्षेत्रावर त्याचा परिणाम होतो. (तुलनेने) व्यवस्थांची हानी कमी होते. हे हळूहळू येणारे अरिष्ट आहे. दुष्काळाचा सामना व्यवस्थित केला, तर समाजावर होणारे दुष्परिणाम कमी करता येतात. या संकटाने विदर्भ आणि मराठवाडा क्षेत्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पावसाची तूट, कोरडा कालावधी, भूजलाचे घटते प्रमाण, कोरड्या विहिरी, धरणाच्या पाणीसाठ्यातील तूट, पिकांची खुंटलेली वाढ दुष्काळाची चाहूल देतात...’
महाराष्ट्र सरकारच्या २०२३च्या राज्य आपत्ती व्यवस्थापन नियोजनातील दुष्काळ प्रकरणाची सुरुवात या तपशिलाने होते. दुष्काळाचा मुकाबला कसा करायचा, याचं सारं स्पष्टीकरण नियोजनात आहे. हवामानशास्त्रीय माहिती, जलशास्त्र, कृषी, पिकांच्या वाढीची दूरसंवेदनाद्वारे तपासणी आणि सामाजिक-आर्थिक माहिती अशा स्वरूपाच्या माहितीच्या संकलनातून दुष्काळाचा अंदाज घेता येतो आणि त्यानुसार पावलं उचलता येतात. त्यासाठी स्थापन करावयाच्या समित्या, त्यांची कामाची पद्धती असं सगळं विवरण महाराष्ट्राच्या या नियोजनात आहे.