
महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे, जिथे शेतकरी हाच समाजाचा कणा आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा सातत्याने अपमान आणि चेष्टा सुरू आहे. निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्याची पूर्तता करण्याची वेळ आली तेव्हा, ‘आपण असे काहीच बोललो नव्हतो,’ असे सांगत सत्ताधाऱ्यांनी हात वर केले. हे कमी होते की काय म्हणून राज्याचे माजी कृषिमंत्री आणि सध्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. कोकाटे हे गर्भश्रीमंत शेतकरी आणि द्राक्ष बागायतदार असले तरी त्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या वेदनेची जाणीव नाही, हेच त्यांच्या वक्तव्यातून दिसून आले.
त्यांच्या नेतृत्वाखालील कृषी विभागाने शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला, जो निश्चितच स्वागतार्ह आहे. तसेच कृषी विभागातील भ्रष्टाचाराला प्रतिबंध करणारे निर्णयही घेतले, ज्यामुळे विभागाची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यास मदत झाली, यात अजिबात शंका नाही. मात्र, त्याचवेळी त्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेली वक्तव्ये आणि त्यांचे बेताल वर्तन यामुळे त्यांच्याविषयी नाराजीचा सूर पसरला. या सर्वामुळे त्यांनी कृषी विभागासाठी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय झाकोळले गेले.