

Cyber attacks in india
esakal
डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबतच सायबर हल्लेही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील वर्षभरात देशात तब्बल २६.५ कोटी सायबर हल्ल्याच्या घटनांची नोंद करण्यात आली. त्यापैकी सर्वाधिक हल्ले हे शिक्षण क्षेत्रात झाल्याचे अधोरेखित झाले.
देशात मागील काही वर्षांत विविध क्षेत्रांत डिजिटायझेशन होत आहे. प्रत्येक काम ऑनलाइन किंवा डिजिटली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विविध तंत्रज्ञानाचा त्यासाठी वापर केला जात आहे. नवतंत्रज्ञानामुळे कामाचे स्वरूप सोपे आणि गतिमान झाले आहे. ज्या कामाला पूर्वी काही दिवस, काही तास लागायचे, ते काम आता अवघ्या काही सेकंदात होऊ लागले आहे. त्यामुळे अलीकडे सर्वच क्षेत्रात बहुतांश सर्वच कामे ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे; परंतु या नवतंत्रज्ञानाच्या वापरासोबतच गैरवापरही बराच वाढला आहे. मालवेअर, रॅन्समवेअर, ट्रॉजन, फाइल इन्फेक्टर, आदींच्या माध्यमातून सायबर हल्ले करून डेटाचोरीसह आर्थिक व्यवहारांवर ताबा मिळवणे, गोपनीय माहिती मिळवणे, संगणकीय प्रणाली बाधित करणे, ती पूर्ववत करण्यासाठी प्रसंगी खंडणी मागणे, आदी सायबर गुन्ह्यांचे प्रमाण अलीकडे बरेच वाढले आहे.