Solar energy
Esakal
सचिन तालेवार
महाराष्ट्रात सौरऊर्जेची अभूतपूर्व क्रांती घडली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०, मागेल त्याला सौर कृषिपंप अशा योजनांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. पर्यायाने उद्योगांना स्वस्त दरात वीज उपलब्ध होत आहे. तर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमुळे घरगुती ग्राहकांचे मासिक वीजबिल शून्यावर येत आहे. हरित ऊर्जेच्या बळावर राज्याने ऊर्जा परिवर्तनाचे खरे सीमोल्लंघन करत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव मिळवला आहे.
स्व स्त वीजदर आणि शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी वीज हे एकेकाळचे स्वप्न आता वास्तवात उतरत आहे. पारंपरिक वीजनिर्मिती, पारेषण आणि वितरण या तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या प्रक्रियांमुळे हे साध्य होणे अवघड मानले जात होते. कोळसा, तेल आणि वायू यांसारख्या पारंपरिक इंधनांच्या वाढत्या किमतींमुळे वीजदरही महाग होत गेले, हा आजवरचा अनुभव आहे. मात्र, गेल्या अडीच-तीन वर्षांत सौरऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्रात स्वस्त दरात वीज मिळत असून तब्बल ४५ लाख शेतकऱ्यांचे दिवसा वीजपुरवठा मिळण्याचे स्वप्न साकार होऊ लागले आहे. या सौरऊर्जा क्रांतीत मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले ऊर्जा परिवर्तनाचे सीमोल्लंघन विशेष महत्त्वाचे ठरत आहे.