
अनिल कवडे, आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे
‘‘एकमेका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ’’ या उक्तीनुसार सहकार चळवळीची वाटचाल सुरु आहे. लोकशाही पद्धतीने नियंत्रित करण्यात येत असलेल्या या संस्थांमध्ये सर्व सदस्यांचा सर्वांगीण विकास व कल्याण हीच मध्यवर्ती भूमिका ठेवून उत्तम व्यवस्था राज्यामध्ये निर्माण करण्यात आली.
आता माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे संगणकप्रणाली व आयुधे उपलब्ध झाली आहेत. सर्व सहकारी संस्थांनी गरजा विचारात घेऊन कामकाज सुयोग्य व सुलभ पद्धतीने चालण्यासाठी या प्रणालीचा उपयोग करून सहकाराचा लाभ सर्व स्तरापर्यंत मिळवून देणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र राज्याचा किंबहुना पूर्ण भारत देशाचा सहकाराचा इतिहास खूप मोठा अलौकिक असा आहे. सावकारी पाशातून जनतेला विशेषत: शेतकरी वर्गाला मुक्त करण्यासाठी सहकारी चळवळीचा पाया ब्रिटीश राजवटीमध्ये भारतामध्ये रचला गेला.