

Climate change
esakal
मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागामध्ये यंदा अतिवृष्टी झाली आणि पूर आला. अनेक भागात प्रथमच अशी पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे हवामान बदलाचीही चर्चा होत असून, त्यातून लहरी हवामानाच्या आव्हानाला सामोरे जात असताना त्याविषयी वेळीच उपाययोजनाही करणे गरजेचे आहे.
राज्याचे भौगोलिक क्षेत्र ३.०८ लाख चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी १६.५ टक्के क्षेत्र वनाच्छादित; तर ३.५ टक्के क्षेत्र झाडांनी आच्छादलेले आहे. राज्यातील जवळजवळ ४२.५ टक्के क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. राज्यात लहान-मोठ्या मिळून ३८० नद्या वाहतात. त्यांची एकूण लांबी अंदाजे वीस हजार किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील पूरप्रवण क्षेत्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सात टक्के असून, काही विशिष्ट भागापुरते मर्यादित होते. परंतु, हवामान बदल, जलाशय प्रचालनातील त्रुटी व चुका आणि शहरी भागातील पुरांमुळे आता महाराष्ट्रातील पूरप्रवण क्षेत्र वाढताना दिसत आहे. या वर्षी तर पावसाने कहरच केला. राज्यातील सर्व विभाग विचारात घेता, ‘महारेन’च्या संकेतस्थळानुसार सरासरी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्ष पावसाची नोंद पुढीलप्रमाणे आहे - जून (९९.५ टक्के), जुलै (८७.४ टक्के), ऑगस्ट (१०५ टक्के) आणि सप्टेंबर (१६७ टक्के).