

Maharashtra municipal elections 2025
esakal
नगरपालिका आणि नगर पंचायतीची निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक अनेक अर्थाने सुप्त क्रांतीची सुरुवात करणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन आकार देणारी आहे. उदाहरणार्थ नगराध्यक्षांची थेट निवडणूक हे प्रारूप नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत वापरले जात आहे. याआधी हे प्रारूप वापरले असले तरीही मोठ्या प्रमाणावर या प्रारूपाचा प्रयोग या निवडणुकीत केला जाणार आहे. यामुळे राजकीय पक्षांचे किंवा अपक्षांचे २८८ नगराध्यक्ष थेट निवडणूक प्रक्रियेतून निवडून येणार आहेत. एका अर्थाने यांची प्रतिमा शहरी-निमशहरी भागातील मिनी आमदार अशी असेल. ही नवीन नेतृत्व घडवण्याची एक प्रयोगशाळा आहे. तसेच गेल्या चारपाच वर्षांच्या तुलनेत निर्णय निश्चितीचे केंद्र प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींकडे सरकणार आहे. राजकीय सहभागाच्या सुप्त क्रांतीत एक खंड पडला होता. तो प्रवाह नव्याने सुरू होणार आहे. याशिवाय राजकीय पक्षांची स्पर्धा आणि निवडणूक मेरिट यामध्ये देखील मोठे फेरबदल या निवडणुकीत दिसणार आहेत. यामुळे ही निवडणूक म्हणजे अशा बदललेल्या लोकशाही पाठशाळेची चित्तवेधक कथा आहे.