

Mahatma Jyotirao Phule Businessman
esakal
प्रसाद घारे - prasad.ghare@gmail.com
एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात महाराष्ट्रात अनेक थोर विभूती होऊन गेल्या. त्यांनी साहित्य, समाजजीवन, शिक्षण, राजकारण, उद्योग अशा विविध क्षेत्रांत अतिशय मूलभूत कार्य केले. यातून केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशातील महत्त्वपूर्ण सुधारणांचा पाया घातला गेला. यातील एक अतिशय महत्त्वाचे आणि आदरणीय नाव म्हणजे महात्मा जोतीराव फुले (वर्ष १८२७ ते १८९०). समाजक्रांतिकारक महात्मा फुले यांची द्विशताब्दी जयंती सध्या आपण साजरी करीत आहोत. त्या काळात प्रथितयश व्यावसायिक आणि उद्योजक म्हणून महात्मा फुले यांनी जो नावलौकिक मिळविला होता, त्यावर प्रकाश टाकणारा हा विशेष लेख.
सध्या (२०२६-२७) महात्मा फुले यांची द्विशताब्दी जयंती आपण साजरी करीत आहोत. आज महात्मा फुले यांच्या जन्माला दोनशे वर्षे पूर्ण होत असताना त्यांनी केलेले कार्य, दिलेला विचार आणि केलेली कृती प्रत्येक मराठी माणसालाच नव्हे, तर देशबांधवांना पथदर्शक ठरणारी आहे. आज सर्वच आघाड्यांवर महिलांनी जी देदीप्यमान कामगिरी केली आहे, तिच्या मुळाशी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाची कवाडे खुली केली, ही ऐतिहासिक घटना कारणीभूत आहे. आधुनिक भारतातील स्त्रीशिक्षणाचे जनक, शेतकरी आणि कामगार यांच्या दुःखांचे निवारण करण्यासाठी चळवळ उभारणारे पहिले व्यक्तिमत्त्व, खरे सत्यशोधक म्हणजे महात्मा फुले. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानत. महात्मा गांधींनी महात्मा फुले हे खरे महात्मा होते, असे गौरवोद्गार काढले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जोतीराव फुले यांना समाजक्रांतिकारक म्हटले, तर ख्यातनाम विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांनी जोतीरावांना आधुनिक भारताचे ‘शिल्पकार’ म्हटले आहे. अशा या महान व्यक्तिमत्त्वाच्या एका पैलूकडे का कोण जाणे, पण आपले जरा दुर्लक्षच झाले. तो पैलू म्हणजे व्यावसायिक आणि उद्योजक महात्मा फुले.