
महेश कोठारे
editor@esakal.com
१९९० मध्ये प्रदर्शित झालेला ‘धडाकेबाज’ चित्रपट प्रचंड गाजला. त्याआधी मी अरविंद सामंत यांच्यासोबत ‘थरथराट’ चित्रपट केला होता, ज्याची निर्मिती त्यानेच केली होती आणि तोही सुपरहिट ठरला. ‘थरथराट’ ‘धडाकेबाज’ च्या आधी म्हणजेच १९८९ साली प्रदर्शित झाला होता. त्या यशानंतर अरविंदला पुन्हा माझ्यासोबत चित्रपट करायचा होता. त्या वेळी मी त्याला सांगितलं, की माझ्याकडे दोन कल्पना आहेत - झपाटलेला आणि जिवलगा. जिवलगा हा चित्रपट एका रांगड्या प्रेमकथेवर आधारित होता. एक रांगडा मुलगा, जो गावात शेतकरी असतो आणि एक मुलगी, जिच्या आईचा खूप मोठा बिझनेस असतो. त्या दोघांची ही प्रेमकहाणी होती. अरविंदला जिवलगाची कथा अधिक आवडली आणि त्याने ती निवडली.