
झपाटलेला या चित्रपटाच्या यशानंतर मला काही तरी वेगळं करायचं होतं. मला वाटत होतं की प्रेक्षकांसाठी काही तरी नवीन करावं. त्या वेळी माझा मुलगा (आदिनाथ कोठारे) अभिनयाची ओढ बाळगून होता. तो सतत मला म्हणायचा की, मलासुद्धा अभिनय करायचाय. त्याच्या अभिनयासाठीची ती आसक्ती पाहून माझ्या मनात एक वेगळीच कल्पना निर्माण झाली. जर असाच एक खेळकर, खोडकर आणि निरागस मुलगा जर मुंबईसारख्या महानगरात गेला आणि अचानक हरवला तर काय होईल...? अशा परिस्थितीत तो मुलगा काय अनुभवेल, काय शिकेल आणि लोक त्याच्याशी कसे वागतील, हे सर्व चित्रपटाच्या माध्यमातून मांडले तर... हीच संकल्पना घेऊन मी ''माझा छकुला'' या चित्रपटाची कथा रचली. मला माझ्या कथेचा गाभा तेथेच सापडला.
आदिनाथ त्यावेळी बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकत होता. ही शाळा शिस्तप्रिय आणि अत्यंत कठोर धोरणांसाठी प्रसिद्ध होती. शाळेच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना चित्रपट किंवा टीव्ही शोजमध्ये भाग घेण्याची परवानगी नव्हती. दरमहा पालकांची सभा होत असे आणि पालकांनी शाळेच्या अभ्यासक्रमाशी कोणतीही तडजोड करू नये, हे ठामपणे सांगितलं जात असे. मला शाळेच्या मुख्याध्यापकांशी चर्चा करून त्यांचा विश्वास संपादन करावा लागला. मी लेखी आश्वासन दिलं की, चित्रपटाच्या शूटिंगमुळे आदिनाथच्या शिक्षणामध्ये बाधा येणार नाही आणि एकाही वर्गाचा तास वाया जाणार नाही. त्यामुळे आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे मे महिन्याच्या कालावधीत चित्रपट पूर्ण करण्याचं ठरवलं.