

Rezang La battle
esakal
ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी, चेन्नईमधली डौलात उभी असलेली मुख्य प्रशासकीय इमारत ‘रेझांग-ला’! या नावाशी जोडला गेलाय पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास! खरं तर, १९६२ मध्ये चीनकडून झालेला दारुण पराभव म्हणजे भारताच्या इतिहासातली भळभळती जखम. त्यासाठी अनेक बाबी कारणीभूत होत्या. मात्र, यात एक गोष्ट शाश्वत होती ती म्हणजे, भारतीय सैन्याची निष्ठा, त्यांचं मनोबल, त्यांचं मातृभूमीसाठी समर्पण! याच युद्धात समोर पराजय दिसत असतानाही निधड्या छातीने लढलेली ‘१३ कुमाऊँ पलटण’ आणि शेवटपर्यंत लढत मातृभूमीच्या मांडीवर चिरनिद्रा घेणारा ‘परमवीर’ मेजर शैतान सिंह यांची ही युद्धकथा!
१८ नोव्हेंबर १९६२ रोजी झालेली ‘रेझांग-ला’ म्हणजे रेझांग खिंडीची लढाई भारताच्या, काय पण जगाच्या लष्करी इतिहासामधली सर्वांत धाडसी बचावांपैकी एक म्हणून ओळखली जाते. सिंह यांच्या नेतृत्वाखालील भारतीय लष्कराच्या १३ कुमाऊँ बटालियनच्या एका कंपनीमधल्या अवघ्या १२० सैनिकांनी तीन हजारांहून अधिक चिनी सैनिकांचा सामना केला. ते निकराने लढले आणि चिनी सैन्याला दीर्घकाळ थोपवून धरलं. अपरिमित धैर्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही लढाई!