
नाद, खटकेबाजपणा, मिश्किलपणा, उपरोधिकता, हजरजबाबीपणा, ही मालवणी बोलीची सर्व वैशिष्ट्ये इथल्या लोककलांमध्ये ठळकपणे येतात. मालवणी नसलेल्या मराठी माणसालाही ही बोली कळते आणि त्यातील जिवंतपणा त्याला भावतो. शेतीशी जोडलेल्या कोकणच्या लोकजीवनातील कारुण्य आणि विनोद या बोलीतील साहित्यात समर्थपणे व्यक्त झाला आहे.
मालवणी बोलीत तिच्या स्वतःच्या अशा कितीक म्हणी आणि समर्पक वाक्प्रचारांची शब्दसंपत्ती मौखिक परंपरेने चालत आली आहे. लग्न होऊन मुलगी सासरी येते, आपल्या नव्या घराचे रीतीरिवाज पाहते. सासूच्या हाताखाली काम करता करता सासरच्या सगळ्या चालीरीती उचलते. हळूहळू सासूचे सगळे गुण-अवगुणही तिच्यात येतात, तेव्हा दोघींचाही अनुभव असलेली एखादी तिसरी बाई पटकन बोलून जाते- ‘घरासारखो गुण आणि सासू तशी सून’! अशा अनेक नादयुक्त म्हणींनी मालवणी बोलीची मौखिक परंपरा वाहती राहिली आहे.