Marathi abhijat bhasha
Esakal
डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याचा केवळ उत्सव साजरा करत राहिल्याने मराठी आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची भाषा होणार नाही. आजही राज्यकर्ते केवळ संमेलने, उत्सव, सप्ताह साजरे करणे, विदेशी दौऱ्यांची निमित्त शोधणे यापलीकडे मराठीसाठी पायाभूत, रचनात्मक कार्य करायला तयार नाहीत. त्यांनी मराठीसमोरील आव्हानांचे गांभीर्य जाणून घेण्याची गरज आहे.
मराठीला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी सुमारे १२-१३ वर्षे तरी पाठपुरावा सुरू होता. २०१२मध्ये महाराष्ट्र सरकारने अहवाल तयार करण्यासाठी एक समिती नेमली. समितीने २०१४मध्ये अहवाल दिला. २०१५मध्ये केंद्राच्या संस्कृती मंत्रालयाने नेमलेल्या समितीने मराठीला अभिजात दर्जा देण्याची शिफारस केली. त्यानंतर आमच्यासारख्या मराठीसाठी कार्य करणाऱ्यांनी राजकीय इच्छाशक्ती जागृत करीत जे वातावरण निर्माण केले, त्यामुळे वर्षभरापूर्वी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्राने दहा वर्षे अडवून ठरलेला दर्जा एकदाचा जाहीर केला.