
ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात भाषेची शुद्धता आणि नव्या शब्दांचा प्रवेश यावर महत्त्वाचे विचार मांडले होते. भाषेत नवे शब्द आल्याने एका अर्थाने भाषा समृद्धच होत असते, असे प्रतिपादन करून त्यांनी मराठी भाषेची प्रगती कशी झाली, याचा वेध इथे घेतलाय...
रंगनाथ पठारे
मराठी भाषेचा इतिहास शोधत आपण सातवाहन काळापर्यंत मागे जाऊ शकतो. एवढे मागे न जाताही मराठीची खरी समृद्धी आपल्याला यादव साम्राज्यात पाहावयास मिळते. यादव काळात मराठी भाषेच्या सुवर्ण युगाला प्रारंभ झाला. ‘चक्रधर-ज्ञानदेव-नामदेव-एकनाथ-तुकाराम’ असा चारशे वर्षांचा कालखंड मराठी भाषा व साहित्य यांच्या सर्वांगीण श्रेष्ठत्वाचा कालखंड होता, असे म्हणणे वावगे होणार नाही.
तेराव्या शतकात देवगिरीचे यादव साम्राज्य लयाला गेले. राजसत्ता व रयत यांच्यांमध्ये कोणत्याही प्रकाराचा संवाद रामदेवराय यादवाच्या काळात अस्तित्वात राहिला नव्हता. राजापासून त्याची प्रजा संपूर्णपणे तुटलेली होती. रामदेवराव यादवाचा प्रधान हेमाद्री हा कडवा वर्णाभिमानी ब्राह्मण असल्यामुळे चातुर्वर्ण्य व्यवस्थेची पकड मजबूत झालेली होती. अशावेळी चक्रधरांनी वर्णव्यवस्था नाकारणारा, स्त्री-पुरुष समता मानणारा आणि व्रतवैकल्यांना हद्दपार करणारा मार्ग समाजाला दाखवला.