
महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आहे. आमची राजभाषा मराठी आहे. मराठी म्हणजे मुंबईचं जगणं आणि जीवन आहे, मराठीच्या बोलीभाषा म्हणजे मराठीचा विस्तार आहे. असं असताना इतर कुठल्याही भाषांना मराठीच्या बोलीभाषा म्हणून उगाच जोडणं म्हणजे त्या भाषांचाही अपमान आहे आणि मराठीच्या बोलींचाही अवमान आहे. मराठी आमची ‘माय’ आहे, आमची अस्मिता आहे. तिच्या बोलीभाषा म्हणजे आमचे श्वास आहेत आणि आई किंवा श्वास जर दुसऱ्यांना दिले, तर मराठी भाषा आणि मुंबई कुठे असेल?
मुंबईची संस्कृती, रीतीरिवाज बदलत चाललेत. हवामान, वातावरण बदलत चालले. मुंबईची अस्मिता, मानसिकता बदलत चाललीय. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली, वृद्धिंगत झालेली मुंबईची संस्कृतीही बदलत चालली. तुम्ही तिच्या मातीची, हवेची, रीतीरिवाजाची संस्कृतीची उपज, तिची भाषा आणि बोलीभाषाही बदलवू पाहत आहात, हे अनाकलनीय आहे.