
Floods in Maharashtra
esakal
पाण्याविना पिकं करपत होती आन गुरं बाजाराला. आता पिकं पाण्यात कुजतात आणि जनावरं जातात वाहून,’ बीड जिल्ह्याच्या पाटोद्यामधील ७९ वर्षांचे राजाभाऊ देशमुख ‘बदल काय झाला?’ हे सांगत होते. ‘शेतकरी वाऱ्याची आणि ढगांची दिशा, आकाशाचा रंग, याकडे लक्ष देत. ते, मुंग्या, पाखरं आणि गुरांकडे डोळे लावून असत. कारण त्यांना निसर्ग, बरा-वाईट पाऊस समजतो. ते घरटी कुठे बांधतात, त्यांच्या वागण्यातला बदल बघून आम्ही पावसाचा अंदाज लावायचो. आता हे सगळं कामात येईना. निसर्ग समजेनासा झालाय.’
दुष्काळ, अवर्षण, गारपीट, वीजबळी आणि शेतकरी आत्महत्या यांनी ग्रासलेला अवघा मराठवाडा आता अतिवृष्टी आणि ढगफुटीने जलमय झाला आहे. २०१० ते २०२५ या १५ वर्षांतील हवामान बदल असा आहे. मे महिन्यापासून, मराठवाड्याच्या ४८३ मंडलांपैकी ४५१ मंडलांत सातत्यानं अतिवृष्टी झाली आहे; कुठे एक वेळा तर काही ठिकाणी ६-७ वेळा. सुमारे सात लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. या पावसाळ्यात १०४ मनुष्य बळी गेले आणि अडीच हजार जनावरं दगावली आहेत. सध्या मराठवाड्यातील ग्रामीण जनतेचं आर्थिक नुकसान आणि मोजता येणं शक्य नाही, अशी अतीव हानी (नॉन इकॉनॉमिक लॉस अँड डॅमेजेस) आहे. शेतीशी निगडीत सेवा, व्यापार आणि उद्योग उद्ध्वस्त झाले आहेत. उडीद-मूग-सोयाबीन-कापूस-भाजीपाला हातातून गेल्यानं दसरा निव्वळ कोरडा गेला आहे. धान्याच्या गाड्यांनी गजबजलेल्या बाजारपेठा आज सुन्यासुन्या आहेत. खरेदीसाठी होणाऱ्या दाटीमुळे पाय ठेवणं मुश्कील होणारा बाजार सध्या उदास आहे. मिट्ट अंधार जाणवून कोणी पुराच्या पाण्यात स्वत:ला लोटून देत आहे. तर कोणी विजेच्या तारेला धरून स्वतःची हत्या करत आहेत.