

McLuhan media theory
esakal
संगणक, इंटरनेट, मोबाईल आणि डिजिटल माध्यमांनी संवेदनेचे आणि अनुभवाचे अवकाश फारच वेगवेगळ्या पद्धतीने विस्तारले आहे. त्यामुळे साहजिकच एक नवी मानसिकता, एक नवे भान प्रस्थापित होऊ लागले आहे.
संवादमाध्यम म्हटले की, आपल्याला मुख्यत्वे आठवतो तो त्यातला आशय. आपली रूची असते त्यातील माहिती, ज्ञान किंवा सौंदर्य याच्यामध्ये. या अर्थाने माध्यमांचा संबंध आपण बहुतेकवेळा फक्त मन-बुद्धीपुरता मर्यादित ठेवतो. तो शरीराशी सहसा जोडत नाही. पण खरं तर माध्यमांच्या वापरातून आपल्या शारीर क्षमतांचे आणि अनुभवांचे अवकाश खोलवर बदलत असते. एकदा ते बदलले की मग इतरही अनेक गोष्टी बदलू लागतात. माध्यमांच्या अभ्यासामध्ये हा विचार आग्रहाने प्रस्थापित केला, तो कॅनेडियन भाष्यकार मार्शल मॅक्ल्युहन यांनी. त्यांनी ही मांडणी केली १९६० च्या दशकात. त्यावेळी संगणक बाल्यावस्थेत होता. इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडिया वगैरे तर कल्पनेतही नव्हते. तरीही मॅक्लुहन यांची मांडणी इतकी मूलभूत होती की, साठ वर्षे उलटून गेली तरी त्यातील सयुक्तिकता कमी झालेली नाही. किंबहुना, आजच्या डिजिटल युगात ती अधिकच महत्त्वाची ठरत आहे. माध्यम म्हणजे वृत्तपत्रे, रेडिओ, सिनेमा, टीव्ही, इंटरनेट असे सर्वसाधारणपणे मानले जाते. पण मक्लुहन यांची माध्यमाची संकल्पना बरीच व्यापक आहे. त्यानुसार ज्यांच्यामुळे डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ या ज्ञानेंद्रियांच्या क्षमतांचा विस्तार होतो ती सारी माध्यमेच. त्यामुळे लिपीपासून ते कपड्यांपर्यंत आणि विजेच्या दिव्यांपासून ते संगणकापर्यंत अनेक गोष्टी या व्याख्येत बसतात. ज्ञानेंद्रियांच्या नैसर्गिक क्षमतांचा जो एकत्रित अनुभव येतो त्याला मॅक्लुहन ‘सेन्सोरियम’ (संवेदन अवकाश) म्हणतात. माध्यम म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या क्षमतेचा विस्तार. त्यामुळे जेव्हा एखादे नवे माध्यम प्रस्थापित होते किंवा लयाला जाते तेव्हा हे नैसर्गिक ‘संवेदन-अवकाश’ बदलते. ते बदलले की, आपली संवादाची, आणि संवादातून निर्माण होणाऱ्या ज्ञानाची व्यवस्थाही बदलू लागते. त्यातून मग हळूहळू आपली सामाजिकता, संस्कृती आणि मानसिकता बदलू लागते.