

Saree Shopping
esakal
ज्ञानेश्वरी ते दासबोध, सावरकर ते ग्रेस, गालिब ते गुलजार, कुसमाग्रज ते सौमित्र, कपिल देव ते शुभमन गिल, वाजपेयी ते मोदी, बिहार निवडणूक ते मनपा रणधुमाळी आणि नियमित पावसाळा ते आता आठ महिने पावसाळा... अशा नानाविध विषयातलं आपल्याला समजू शकत असलं, तरी ‘ह्यातलं तुला काही कळत नाही...’ हे बायको का म्हणते, याचा प्रत्यय मला साडीखरेदी करताना ‘याचि देहि, याचि डोळा’ येत होता...
‘या जगात कोणीही काहीही फुकट देत नाही’ या वाक्यावर माझा थोडाफार असलेला विश्वास अधिक घट्ट होण्यास आणि मला त्याची थेट प्रचिती येण्यास कारणीभूत ठरलेला प्रसंग मी आजन्म विसरू शकत नाही! खरं म्हणजे, विसरू नये म्हणूनच काही प्रसंग आपल्या आयुष्यात घडतात (की जीवावर बेततात?) असं म्हणून मी स्वतःची समजूत काढून घेतली खरी, पण ती तात्पुरती ‘समजूत’च आहे, हे मलाही ठाऊक होतं आणि त्या ‘समजुतीला’ही! माझ्यासारख्या विचारी, सजग, सुजाण आणि कार्यतत्पर (?) वगैरे व्यक्तीला आपण हे वेडं साहस करू नये, हे आधीच कळायला हवं होतं खरं, पण ‘नाविलाज को क्या इलाज’ ह्या नवसैद्धान्तिक वरवंट्याखाली माझ्यातला सजग वगैरे पुरुष भरडला गेला आणि फक्त ‘नवरा’च काय तो उरला... कारण? कारण हा प्रसंग होता बायकोसाठी साडी खरेदी करण्याचा आणि तीसुद्धा एकावर एक ‘फ्री’!